"लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा?"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:57 PM2021-05-21T18:57:35+5:302021-05-21T19:03:40+5:30

Sachin Sawant : महाराष्ट्राला अधिक लसी मिळवण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले पाहिजेत पण त्याऐवजी केंद्र सरकारने दिलेल्या अपुऱ्या लसींचे ते समर्थन करत आहेत हे दुर्दैवाचे आहे असे सचिन सावंत म्हणाले.

"How is Gujarat's strike rate higher than Maharashtra's in getting vaccines?" Congress Leader Sachin Sawant | "लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा?"

"लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा?"

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्राने लसीकरणात दुजाभाव करूनही महाराष्ट्राने लसींचे वेस्टेज अत्यल्प राखत २ कोटींपेक्षा जास्त लसीकरण करून देशात आघाडी घेतली आहे, असे सचिन सावंत यांनी सांगितले. 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला भरीव मदत केल्याचा कांगावा भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असतात. वास्तविक पाहता मदत देताना मोदी सरकारने महाराष्ट्राशी सातत्याने भेदभावच केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठ्यातही दुजाभाव केल्याचे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्राच्या १३ कोटी लोकसंख्येला २ कोटी लसी तर गुजरातच्या ६.५० कोटी लोकसंख्येला १.६२ कोटी लसी का? तरी आपण म्हणता महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या असे कसे म्हणता?  मोदीकृपा गुजरातवर अधिक का बरसते? समन्यायी तत्वांना तिलांजली देणाऱ्या मोदी सरकारचे वाटपाचे निकष काय? अशा प्रश्नांची सरबत्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. (Congress Leader Sachin Sawant criticized Devendra Fadnavis on Corona Vaccination)

महाराष्ट्रात कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस १९ मे ला केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ४,०४,२२९ आहेत तर गुजरातमध्ये ९२,६१७ आहेत. संकलित कोरोना रुग्ण महाराष्ट्रात ४९ लाख ७८ हजार ३३७ तर गुजरातेत ६ लाख ६९ हजार ४९० आहेत. एकूण मृत्यू महाराष्ट्रात ८४ हजार ३७१ तर गुजरातमध्ये ९ हजार ३४० तरीही महाराष्ट्राला २ कोटी लसी व गुजरातला १.६२ कोटी लसी का? फडणवीसांचा स्ट्राइक रेट हा शब्द फार आवडीचा असल्याने लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा?
याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. खरंतर महाराष्ट्राला अधिक लसी मिळवण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले पाहिजेत पण त्याऐवजी केंद्र सरकारने दिलेल्या अपुऱ्या लसींचे ते समर्थन करत आहेत हे दुर्दैवाचे आहे असे सचिन सावंत म्हणाले.

याचबरोबर, केंद्र सरकारने सर्व राज्यांवर समान ममत्व ठेवले पाहिजे. पण मोदी सरकार कोरोनाच्या संकटातही समन्यायी तत्वाला तिलांजली देऊन मनमर्जी प्रमाणे वैद्यकीय साधनांचे वितरण करत आहे. या वाटपाचे निकष काय याचे उत्तर देखील फडणवीस यांनी दिले पाहिजेत. केंद्राने लसीकरणात दुजाभाव करूनही महाराष्ट्राने लसींचे वेस्टेज अत्यल्प राखत २ कोटींपेक्षा जास्त लसीकरण करून देशात आघाडी घेतली आहे, असे सचिन सावंत यांनी सांगितले. 

(कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी 'बनारस मॉडेल', नरेंद्र मोदींवर नवाब मलिकांचा निशाणा)

आजही लसींचा पुरेसा साठा केला तर महाराष्ट्राची दररोज १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु सर्व अधिकार केंद्र सरकारकडे ठेवून राज्य सरकारांना वेठीस धरल्याने राज्य सरकारांना अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे. मोदी सरकारकडे लसीकरणाचे कोणतेही धोरण व पूर्व नियोजन नसल्याने लसीकरणाची पूर्ण मोहीम अपयशी ठरत आहे. याचाही राज्यांना त्रास होतो आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्राला भरीव मदत दिल्याचा भाजपाकडून केला जात असलेला दावा निखालस खोटा आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार- नाना पटोले
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून १११ अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात येणार असून यासंदर्भातील पत्रं आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच, राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Web Title: "How is Gujarat's strike rate higher than Maharashtra's in getting vaccines?" Congress Leader Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.