लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती असून, ते कोणत्याही क्षणी राजीनामा देतील, अशी दाट शक्यता आहे.
‘आधी चौकशी, की आधी फाशी?’ असा राठोड यांचा बचाव सुरुवातीला शिवसेनेने केला होता; पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोड यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल अखेर घेतली आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले, असे सूत्रांनी सांगितले. राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशनच चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच सोमवारपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली. त्यातच पूजा राठोड प्रकरणात रोजच्या रोज नवे आरोप होत असल्याने राठोड यांच्या अडचणीत भरच पडत आहे. त्यामुळे राठोडांचा राजीनामा घ्यायचा, की विरोधकांना अंगावर घ्यायचे? असे दोनच पर्याय सरकारसमोर आहेत. भाजपच्या महिला आघाडीने राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात शनिवारी निदर्शने केली.
ऑडिओ क्लिपमुळे जोडला गेला संबंधपूजा राठोड या अविवाहित तरुणीचा यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यात आला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पूजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली. पूजा राठोड म्हणजेच पूजा चव्हाण असल्याची बाब आता ठळकपणे समोर येत आहे. पूजा राठोड, अरुण राठोड आणि मंत्र्यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लिप यांचा संबंध संजय राठोड यांच्याशी जोडला गेला आणि त्यांचा पाय अधिकच खोलात गेला. राठोड यांनी राजीनामा दिल्यास तो महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का असेल.
राष्ट्रवादीचीही इच्छाराठोड यांनी राजीनामा द्यावा, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचविले असून काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी हीच भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
‘आपण घ्याल तो निर्णय मला मान्य असेल,’ असे राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विरोधक टाकणार चहापानावर बहिष्कार!टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू द्यायचे नाही, अशी भूमिका विरोधी पक्ष भाजपने घेतली आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून रणकंदन अटळ दिसत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यापुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. - वृत्त-स्टेट पोस्ट