पुणे : काँग्रेसकडून माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा एकदा लोकसभा लढवण्याची संधी दिली जाऊ शकते अशा प्रकारचे मत काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी व्यक्त केल्यामुळे पक्षात अनेकांना धडकी भरली आहे.पुण्याच्या राजकारणात कलमाडी पुन्हा ऍक्टिव्ह झाले तर चित्र कधीही बदलू शकते याची कल्पना असल्यामुळे काँग्रेससह विरोधकही अस्वस्थ झाल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेसचे माजी खासदार कलमाडी यांचे काँग्रेसतर्फे निलंबन करण्यात आले असून सध्या पुण्यात काँग्रेस खिळखिळी झाल्यासारखी दिसत आहे. त्यातचं शहरात भारतीय जनता पक्षाच्या झंझावाताच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या कष्टाने टिकाव धरताना दिसत आहे. शिवसेना आणि मनसे तर केव्हाच पिछाडीवर फेकले असून काँग्रेसही गटबाजीमुळे मागे पडत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या जागेवर हक्क सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या तुल्यबळ उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. त्यातच सहप्रभारी पदावर असलेल्या व्यक्तीने केलेले वक्तव्य दुर्लक्षून चालणार नाही.
कलमाडी सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फारसे लोकांमध्ये मिसळत नाहीत. मात्र शहराचा कोपरा न कोपरा आणि काँग्रेसचा माणूस न माणूस त्यांना आजही माहिती आहे . त्यामुळे ऐनवेळी सध्या इच्छूक म्हणून चाचपणी करणाऱ्यांना पक्षाने डच्चू दिला तर आश्चर्य वाटायला नको. मात्र शहरात सर्वत्र भाजपचे राज्य असल्यामुळे त्यांना ही लढाई तितकीशी सोपी असणार नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत काँग्रेसमधील बदलते चित्र बघणे औत्युक्याचे ठरणार आहे.