मुंबई : महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवतेय, कुठून चालतंय हे काहीही कळत नाही. हे सरकार घरी पाठविण्यासाठी निशाणा साधण्याची वेळ आली असून सत्तेतील सध्याचे तिन्ही पक्ष विरोधी पक्षात दिसतील आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे भाकित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी वर्तविले. महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.नड्डा म्हणाले की, राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते, त्यांनी तसा कौलही दिला होता. पण राजकारणात कधी कधी धोका होतो. तो धोका राज्यातील जनतेसोबत झाला. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या सत्तेत असलेले तिन्ही पक्ष येणाऱ्या काळात तुम्हाला नेहमीसाठी विरोधी पक्षात दिसतील.काँग्रेस, राष्ट्रवादीने शेतकरी कायद्यांना केलेल्या विरोधाचा समाचार घेताना ते म्हणाले, शरद पवार यांनी आधी शेतकरी कायद्याचे समर्थन केले तर ते चांगले आणि मोदींनी ते मंजूर केले तर मोदी देशद्रोही कसे? काँग्रेसने आधी कायद्यांचे सूतोवाच केले आणि आता मोदींनी कायदे केल्यानंतर तेच आज ट्रॅक्टर जाळून निषेध करत आहेत. हा सरळसरळ बेगडीपणा आहे, असेही नड्डा म्हणाले.यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिवपदी नियुक्त झाल्याबद्दल विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजयाताई राहाटकर, सुनील देवधर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.महिला अत्याचारांविरुद्ध मंगळवारी राज्यभर निदर्शनेराज्यात महिला अत्याचार, बलात्काराच्या वाढत्या घटनांविरुद्ध आवाज उठविण्यासाठी १२ आॅक्टोबरला भाजपच्या वतीने राज्यात ७०० ठिकाणी निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा लाँगमार्च निघेल.केंद्राच्या शेतकरी कायद्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते थेट बांधावर जाऊन शेतकºयांना भेटतील. तसेच, कामगार कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी कारखान्यांच्या गेटवर जाऊन भूमिका मांडतील, असे ठराव मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर; जे.पी. नड्डा यांचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 2:56 AM