नवी दिल्ली : भाजपमध्येही अंतर्गत कलह वाढत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातील आवाज शांत होताना दिसत नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना दूर करण्यासाठी त्यांच्याच आमदारांनी आघाडी उघडली आहे. या आमदारांचा आरोप आहे की, राज्यात बदल्या, पोस्टिंगमध्ये येडियुरप्पा यांच्या कुटुंबाचा हस्तक्षेप होत आहे. परिणामी पूर्ण सरकार कुटुंबाच्या इशाऱ्यांवर चालत आहे.
कर्नाटकशिवाय पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आसाममध्येही वादावादी होत आहे.मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात आमदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होत आहे. नरेंद्र मोदी - अमित शाहदेखील शिवराज सिंह चौहान यांच्यावर खूश नाहीत. त्यामुळे नरोत्तम मिश्रा यांना आतून पाठिंबा मिळत आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचापराभव झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह शुभेंदु अधिकारी यांना प्रोत्साहन देत आहेत तर दुसरीकडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांना पदावरून दूर करण्याची मोहीम सुरू झाली आहे.
सरमा व सोनोवाल यांच्यात शीतयुद्ध : आसाममध्ये हेमंत बिस्व सरमा यांना मुख्यमंत्री बनविल्यानंतर माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल नाराज आहेत. त्यामुळे सरमा व सोनोवाल यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे.