काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बंडखोरीची भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 07:49 AM2021-02-28T07:49:06+5:302021-02-28T07:49:06+5:30
पक्ष दुबळा होण्यास व पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होण्यास नवे नेतृत्व कारणीभूत असल्याची टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता करण्यात आली. कार्यकर्ते हताश झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जम्मू / नवी दिल्ली : दिवसेंदिवस काँग्रेस पक्ष दुबळा होत असून, त्यात ताबडतोब बदल करण्याची गरज आहे आणि त्यासाठी गुलाम नबी आझाद यांची पक्षाने मदत घ्यायलाच हवी, असे उघड आवाहन काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी केले. त्यांचे हे आवाहन म्हणजे पक्ष नेतृत्वाविरोधात केलेले बंडच मानले जात आहे. गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मूमध्ये झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात राज बब्बर, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदर हुड्डा, विवेक तनखा यांनीही आझाद यांच्या समर्थनार्थ भाषणे केली. त्या सर्वांचा सूर पक्ष नेतृत्वात बदल होणे गरजेचे आहे, असाच होता. स्वत: आझाद यांनीही आपण राज्यसभेतून
निवृत्त झालो असलो तरी राजकारणातून बाहेर गेलेलो नाही, असे सांगून एका प्रकारे पक्ष नेतृत्वाला आव्हानच दिले.
पक्ष दुबळा होण्यास व पक्षाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होण्यास नवे नेतृत्व कारणीभूत असल्याची टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता करण्यात आली. कार्यकर्ते हताश झाले आहेत. त्यामुळे आपल्याला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राज बब्बर यांनी केले.
काँग्रेसमध्ये वेगळी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांचा जो गट जी-२३ नावाने ओळखला जातो, त्यातील हे सर्व नेते आहेत. या नेत्यांनी पक्षात सुधारणा घडवून आणण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मेळावे घेण्याची भाषा केली. जम्मूनंतर ते आता पंजाबमध्ये मेळावा घेणार आहेत.