नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात त्यांना असा आग्रह करण्यात आला आहे की, त्यांनी आपल्या मुलाला कृषी कायदे रद्द करण्यास सांगावे. नरेंद्र मोदी यांचे मन वळविण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग त्या एक आई म्हणून करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी हरप्रीत सिंह यांनी हिंदीत हे पत्र लिहिले आहे. देशाच्या एकूण विकासात शेतकऱ्यांचे योगदान आणि इतर अनेक मुद्दे पत्रात लिहिले आहेत. सिंह यांनी म्हटले आहे की, मी हे पत्र जड अंत:करणाने लिहित आहे. आपणास ठाऊक असेल की, शेतकरी थंडीतही दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. यात ९०-९५ वर्षांच्या आजोबांपासून ते मुलांपर्यंत आणि महिलांचाही समावेश आहे.