LMOTY 2020: “भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात असल्यानं दिल्लीवारी”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:02 PM2021-03-18T17:02:29+5:302021-03-18T17:05:28+5:30
Mansukh Hiren Death, NCP Nawab Malik On BJP Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या(NCP) आग्रही मागणीमुळेच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचं बोललं जातं, हेमंत नगराळे(Hemant Nagrale) यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई – राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे मोठ्या घडामोडी घडत आहेत, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती, या प्रकरणात NIA ने पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक केल्यानं सरकारची कोंडी झाली, या स्फोटक प्रकरणाचा तपास ठाकरे सरकारने सचिन वाझेंवर सोपवला होता, परंतु वाझे यांनीच हा कट रचल्याचा संशय NIA ला आहे. या प्रकरणी वाझेंविरोधात भक्कम पुरावे मिळत असल्याचा दावा NIA करत आहे.(Minister Nawab Malik Target BJP Devendra Fadnavis over Sachin Vaze Case)
इतकचं नाही तर सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीतही अनेक घडामोडी घडत आहेत, शरद पवार वाझे प्रकरणावर नाराज असल्याची बातमी आली होती, राष्ट्रवादीच्या(NCP) आग्रही मागणीमुळेच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचं बोललं जातं, हेमंत नगराळे(Hemant Nagrale) यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली आहे. या प्रकरणावर विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाल्याचं दिसून येतं, देवेंद्र फडणवीस यांनी थेट दिल्लीतून पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या.
मात्र देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्यावरून आता मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी चिमटा काढला आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर (Lokmat Maharashtrian of The Year) कार्यक्रमात नवाब मलिकांना फडणवीसांच्या दिल्लीवारी बद्दल प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्ष नेते पद धोक्यात आलं आहे अशी चर्चा मी ऐकली आहे, त्यामुळे ते दिल्लीला गेले असतील असा चिमटा मलिकांनी फडणवीसांना काढला. तर मनसुख हिरेन तपास NIA ला देण्यावरूनही मलिकांनी भाजपाला टोला लगावला. उद्या भाजपावाले बोलतील की अमित शाह याना राज्याचे गृहमंत्री करा असं म्हणून त्यांनी फडणवीसांच्या मागणीची खिल्ली उडवली.
दिल्लीत घडामोडी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) सध्या दिल्लीत बुधवारी दिल्लीत होते, या प्रकरणावर फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्यासाठी २०१८ मध्ये खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन करून दबाव आणला होता असा गौप्यस्फोट केला. या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा(Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे राज्यात पुढे काय करायचं याचा फायदा घेता येईल का? अशी चर्चा या भेटीत झाल्याची शक्यता आहे, अशी बातमी एबीपीने दिली आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
मी मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये निलंबित एपीआय सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता, मला उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray) फोन आला होता, शिवसेनेचे दोन मंत्रीही भेटले होते, परंतु या प्रकरणात मी वाझेंची फाईल तपासली, त्यानंतर त्यावेळी अँडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला, तेव्हा वाझेंना घेणं योग्य राहणार नाही, कारण हायकोर्टात त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरु होती असं मला सांगण्यात आला, हा सल्ला लेखी नव्हता तर तोंडी होता, म्हणून मी त्यांना पोलीस दलात पुन्हा घेतलं नाही असा दावा फडणवीसांनी केला होता. त्याचसोबत सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला, ते शिवसैनिक म्हणून काम करत होते, काही शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांचे व्यवसायिक संबंध आहेत, राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आल्यानंतर कोरोना काळात आढावा कमिटीचा अहवाल बनवण्यात आला, यात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेतलं. सचिन वाझे यांना सोडून कोणत्याही अधिकाऱ्याला सरकारनं पोलीस सेवेत पुन्हा रुजू केलं नव्हतं असंही फडणवीस म्हणाले.