LMOTY 2020 : सचिन वाझे प्रकरणामुळे शिवसेना एकटी पडलीय? अनिल परब म्हणतात….
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:54 PM2021-03-18T20:54:23+5:302021-03-19T10:17:37+5:30
Anil Parab Criticize Devendra Fadanvis : सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी असलेले महाविकास आघाडी सरकारची कोंडी झालेली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेनेची कोंडी झाली होती.
मुंबई - सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी असलेले महाविकास आघाडी सरकारची कोंडी झालेली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेनेची कोंडी झाली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शिवसेनेच्या बचावासाठी तितकेसे पुढे येताना दिसत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर सचिन वाझे प्रकरणात शिवसेना एकटी पडली आहे का, अशी विचारणा केली असता शिवसेना नेते अनिल परब यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे प्रकरणात शिवसेना एकटी पडली आहे, असे मला वाटत नाही, असे परब यांनी सांगितले.
आज मुंबईत झालेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याला राज्य सरकारमधील परिवहन आणि संसदीय कार्य या खात्यांची जबाबदारी सांभाळणारे अनिल परब उपस्थित होते. त्यावेळी परब यांना सचिन वाझे प्रकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणात शिवसेना एकटी पडली असं मला वाटत नाही. अधिवेशन काळात आमची सकाळी एकत्र बैठक होते. त्या बैठकीत नियोजन, फ्लोअर मॅनेजमेंटवर चर्चा होते. संसदीय कार्यमंत्री या नात्याने तिन्ही पक्षांच्या संपर्कात राहावे लागते. तसेच सचिन वाझेंचा विषय असला तरी याबाबत तिन्ही पक्षात एकवाक्यता होती, असे परब म्हणाले.
यावेळी सचिन वाझे प्रकरणात पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या देवेंद्र फडवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. फडणसीस यांनी पुरावे दाखवले. आम्ही पुरावे देण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी ते पुरावे अद्याप दिलेले नाहीत. सीडीआर हा पुरावा होऊ शकत नाही. सनसनाटी निर्माण करण्याची त्यांना सवय झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना एकही पुरावा नाही, त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.