Lok Sabha elections 2019: 'मोदी मोदी' म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा; आमदाराचा बेताल आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:33 PM2019-03-25T12:33:49+5:302019-03-25T12:34:29+5:30
लोकसभा 2019ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे.
बंगळुरूः लोकसभा 2019ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. वाचाळवीर नेत्यांच्या यादीत आता जनता दल संयुक्त(जेडीएस)चे आमदार शिवालिंग गौडा यांचंही नाव जोडलं गेलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे.
कर्नाटकातील एका जनसभेला संबोधित करताना शिवालिंग गौडा म्हणाले, मोदी मोदीच्या घोषणा देणाऱ्यांच्या कानशिलात लगावा. मोदींनी जशी आश्वासन दिली होती, तसे कोणाच्या खात्यात आतापर्यंत 15 लाख आले आहेत काय?, जो कोणी भाजपा नेता प्रचारादरम्यान तुमच्याजवळ येईल त्याला पहिला प्रश्न हा विचारा. भाजपा प्रवक्ते आणि आमदार सुरेश कुमार यांनी शिवालिंग गौडा यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.
गौडा मोदींच्या विरोधात हिंसात्मक वातावरण निर्माण करत आहेत. सुरेश म्हणाले, एका आमदारानं तर समर्थकांना मोदींवर दगडफेक करण्यासही सांगितलं होतं. यापूर्वीही अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रति त्यांच्या घृणास्पद वागणुकीचं हे उदाहरण आहे. गेल्या निवडणुकीत मोठी आश्वासने मोदींनी दिली होती. मात्र त्यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याचे शिवालिंग गौडा यांनी म्हणत भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. मात्र, बोलताना त्यांची जीभ घसरली. जेडीएसनं काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुका लढत आहे. राज्यांतही दोन्ही पक्ष मिळून सरकार चालवत आहेत. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत 18 आणि 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 2019ची लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. 23 मे रोजी निवडणुकीचे निकाल येतील.