नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीतील अब की बार मोदी सरकार ही भाजपाची घोषणा अतिशय गाजली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं नवी घोषणा दिली आहे. फिर एक बार, मोदी सरकार, असं म्हणत यंदा भाजपाकडून पुन्हा एकदा मोदींच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. नवी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींनी टॅगलाईनची घोषणा केली. यावेळी थीम सॉन्गदेखील प्रसिद्ध करण्यात आलं. याआधी सकाळी काँग्रेसनं निवडणुकीसाठी टॅगलाईनची घोषणा केली. काँग्रेसनं न्याय योजनेवर लक्ष केंद्रीत करणारी 'अब होगा न्याय' अशी घोषणा दिली आहे. काँग्रेसच्या टॅगलाईनची घोषणा झाल्यावर भाजपाच्या टॅगलाईनबद्दल उत्सुकता होती. अखेर दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींनी भाजपाच्या टॅगलाईन आणि थीम सॉन्ग प्रसिद्ध केलं. फिर एक बार, मोदी सरकार ही आमची घोषणा असेल. राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील, असं जेटलींनी पत्रकारांना सांगितलं. 'मोदीजींच्या सरकारनं अनेक विकासकामं केली आहेत. महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच काम करणारं सरकार हीच भाजपाच्या प्रचाराची संकल्पना आहे. याशिवाय इमानदार सरकार ही संकल्पनादेखील प्रचारात असेल,' असं जेटली म्हणाले. याशिवाय मोठे निर्णय घेणारं सरकार आणि फिर एक बार मोदी सरकार, या टॅगलाईनदेखील वापरल्या जाणार आहेत. सरकारनं केलेल्या कामांची आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती टीव्हीवरील जाहिरातींमधून देण्यात येणार आहे. यासोबतच भाजपानं एक व्हिडीओदेखील लॉन्च केला आहे.