मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस(Congress) पक्षाने स्वबळावर आगामी निवडणुका लढवणार असल्याची भूमिका मांडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी राज्यात दौरा काढून वारंवार हे विधान केले आहे. पटोलेंच्या या विधानावर महाविकास आघाडीतल्या काहींनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचं प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी म्हटलं होतं.
काँग्रेसच्या या भूमिकेनंतर आज सामना अग्रलेखातून शिवसेनेने(Shivsena) काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र निवडणूक लढवावी लागेल असं म्हटलं आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवरून राष्ट्रवादीनेही काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तिघांनी एकत्र राहिले पाहिजे. परंतु कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी स्पष्ट केले आहे.
पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणूक(Elections) लढवण्याची भाषा करत करत असतील. पण कोणत्या पक्षाचं किती बळ आहे हे राज्यातील जनतेला माहिती आहे. तिघांनी एकत्रित निवडणूक लढवणं हे फायद्याचं आहे. सध्या ते स्वबळावर निवडणूक लढवायचं म्हणत असले तरी निवडणुका आल्यावर वेगळा विचार करू शकतात. पण तो नाहीच केला तर समविचारी पक्ष एकत्र राहतील. महाराष्ट्रातील जनतेचीही तीच इच्छा आहे असं जयंत पाटील म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले होते?
राज्यातील काही पक्षांना स्वबळाचं अजीर्ण झालं आहे. भाजपाने स्वबळाचे संकेत आधीच दिले आहेत. आता काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत. आता उरले कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही. मात्र राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला
महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती
राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे अशा शुभेच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्या असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राज्यपाल नियुक्त १२ उमेदवारांची यादी राज्यपालांकडे आहे. त्यावर विचार झालेला नाही. महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती परंतु यावेळी थोडासा विलंब झाला आहे मात्र आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देणं आणि दिर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा करणं एवढाच माझा आणि त्यांच्या भेटीचा विषय होता असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.