Maharashtra Vidhan Sabha: शिवसेना-काँग्रेसला टोला; “अजित पवारांसोबत ७२ तासांची केलेली मैत्री अद्यापही कायम, मात्र...”
By प्रविण मरगळे | Published: March 3, 2021 03:47 PM2021-03-03T15:47:18+5:302021-03-03T16:02:06+5:30
Maharashtra Vidhan Sabha Budget Session; कोविड योद्धे म्हणून अभिनंदन करायचं मात्र त्यांना देण्यासाठी ६-६ महिने पैसे नाहीत, हे सरकार करंटं आहे अशा शब्दात मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली.
मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारवर पुन्हा प्रहार केला, जळगावातील एका वसतिगृहाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरत राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली, पण त्याचपुढे जात मुनगंटीवारांनी शिवसेना-काँग्रेसला राजकीय लव्ह जिहाद केल्याचा टोला लगावला आहे.(BJP Sudhir Mungantiwar Target CM Uddhav Thackeray)
याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे सरकार उडाणटप्पू आहे आणि हा संसदीय शब्द आहे. एकीकडे विधानसभा चमकवण्यासाठी १५ कोटी रुपये आहेत तर गोरगरिबांना देण्यासाठी पैसा नाही, कोविड योद्धे म्हणून अभिनंदन करायचं मात्र त्यांना देण्यासाठी ६-६ महिने पैसे नाहीत, हे सरकार करंटं आहे अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली.
त्याचसोबत महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे राजकीय लव्ह जिहाद आहे, आम्ही अजित पवारांसोबत ७२ तासांची मैत्री केली होती, पण तरीही मैत्री कायम आहे, पण शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले हा राजकीय लव्ह जिहाद होता असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला आणि काँग्रेसला लगावला आहे.
आमच्या आईबहिणी सुरक्षित नसतील तर...
जळगावात शासकीय महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी बाहेरच्या पुरूषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडत असल्याचं प्रकरण उघड झालं, या प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली, आमच्या राज्यातील आई-बहिणींना नग्न करून नाचायला लावलं जात आहे, त्याचे व्हिडिओ समोर आले तरी आम्ही नोंद घेऊन असं सांगितलं जातं, आजपासून मी स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे, आमच्या आई बहिणी सुरक्षित नसेल तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट अशा शब्दात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
दोन दिवसांत चौकशी करून कारवाई करू – सरकार
सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीनंतर या सदर घटनेची चौकशी सुरू असून पुढील २ दिवसांत तात्काळ दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहाला दिली.