मनसेसाठी आनंदाची बातमी! राज ठाकरे जोमात; कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 01:59 AM2020-10-09T01:59:53+5:302020-10-09T06:49:43+5:30
‘कृष्णकुंज’वर पुन:श्च हरिओम; राज ठाकरेंकडे गर्दी वाढली
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी सध्या मागण्या घेऊन येणाऱ्या शिष्टमंडळाची गर्दी वाढत आहे. मूर्तिकार, मुंबईचे डबेवाले, जिम मालक-चालकांपासून मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी ओघ वाढल्याने मनसेतही उत्साहाचे वातावरण आहे.
ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी विश्वस्त, संचालकांनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यानंतर राज यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी मोबाइलद्वारे चर्चा केली असता लवकरच याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.
अलीकडेच डोंगरी भागातील कोळी महिलांनी अनधिकृत मासे विक्रेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पालिकेनेही डोंगरी भागात तातडीने कारवाईचा बडगा उगारला होता. तर, मुंबईतील डबेवाल्यांनी लोकल प्रवासाच्या मागणीसाठी कृष्णकुंज गाठले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा देणारा निर्णय घेतला.
अलीकडच्या काळात शिष्टमंडळांनी कृष्णकुंज गाठावे आणि राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवावे, असा शिरस्ता सुरू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी राज यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीला चाप लावण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवले होते.
नव्या बदलाची नांदी?
भाजप हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असताना राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर होणारी गर्दी अनेकांना अचंबित करणारी आहे. विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी भाजपे नेते सरकारविरोधात रान उठवत असताना राज ठाकरे यांच्याकडे वाढलेला ओघ ही नव्या राजकीय बदलांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.