सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनीनरेंद्र मोदींची वेगळी भेट घेतली. त्यावरून असा दावा करण्यात येत आहे. या भेटीवर भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले(MP Udayanraje Bhosale) यांनीही भाष्य केले आहे.
खासदार उदयनराजे म्हणाले की, मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली असं सांगतात. परंतु आरक्षणावर आधी अधिवेशन बोलवायचं होतं, चर्चा करायची मग पंतप्रधानांना भेटायचं होतं. आता भेट झाली ती राजकीय तडजोडीसाठी आहे. आम्ही हे करतो पण एकत्र या अशी देवाणघेवाण या भेटीतून होणार आहे. राज्यातलं वातावरण बघता आपण एकत्र येऊ आणि लग्न पुन्हा लावून समाजाला शांत करूया असीच भेटीत चर्चा झाली असणार असा टोला उदयनराजेंनी लगावला आहे.
तर नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे कुटुंबाचे संबंध चांगले आहेत. काही चिंता करायची गरज नाही, हे सरकार ५ वर्ष चालेल. नवीन सत्ता समीकरणाचा विषय नाही. केंद्र सरकारसोबत संवाद वाढतोय तो आणखी वाढत राहावा. केंद्र आणि राज्य सरकारचे चांगले संबंध ही घटनात्मक गरज आहे. राज्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करत राज्यातील सत्तांतरावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यास गेले तेव्हा त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार(DCM Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) हजर होते. परंतु या भेटीनंतर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा इतर दोघं बाहेर होते. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
जवळपास एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भलेही राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नाही. परंतु त्याचा अर्थ आमचं नातं संपलं असा नाही. मी नवाज शरीफ यांना थोडी भेटायला गेलो होतो जे लपून भेटलो. जर मी वैयक्तिक पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत असेल तर त्याच चुकीचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.