अमरावती – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला, या निर्णयामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला, पुण्यात सुरू झालेलं आंदोलन राज्यभरात पोहचलं, ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, यात अमरावती येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, विद्यार्थ्यांना पोलिसांनी कॉलर पकडून जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं, यावरून माजी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांनामध्ये बाचाबाची झाली.( Clashes between Anil Bonde and Police when MPSC Students Protest Against Thackeray Government)
अनिल बोंडे आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, आम्ही सरकारकडे मागणी करतोय, तुमच्याकडे नाही, तर तुम्ही आंदोलन केलंय त्यावर आम्हाला नियंत्रण आणावं लागेल, तुम्ही आम्हाला शहाणपणा कसा शिकवता? असा प्रश्न पोलिसांनी केला. त्यावर अनिल बोंडे यांनी एवढ्या मुलामुलींना तुम्ही आतमध्ये कोंडलं, तुम्हाला समजत नाही का? असा प्रतिप्रश्न केला होता.
पोलीस अधिकारी आणि अनिल बोंडे यांच्यातील शाब्दिक युद्ध वाढत असतानाच बोंडे यांनी तुम्ही सरकारचे कुत्रे आहात म्हणून हिणवलं, त्यावर संतप्त अधिकाऱ्यानेही तुम्ही पण कुत्रेच असल्यांच प्रत्युत्तर दिलं, यानंतर पोलिसांनी अनिल बोंडे यांना ताब्यात घेतले.
नेमकं काय घडलं?
आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस व्हॅनमधून बाहेर काढण्यासाठी सरसावलेले माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना एका पोलीस उपनिरीक्षकांनी मज्जाव केला. विद्यार्थी हे स्वत:च्या हक्कासाठी लढा देत आहेत,असे बोंडे म्हणाले. मात्र, कोरोनाकाळात आंदोलन करता येत नाही, सरकारकडे मागणी करा, असे ठाणेदार चोरमले म्हणाले. संयमाने बोला, संयम शिकवू नका, असे बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले. मुलींना पोलीस व्हॅनमधून कोंबून नेता. महिला पोलीस सोबत नाही, त्या काही चोर नाहीत, असा मुद्दा बोंडे यांनी उपस्थित केला. चोरमले तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून झाले का, असेही ते म्हणाले. आंदोलकांना संधी दिली आहे, असे चोरमले म्हणाले. तेव्हा बोंडे यांनी उसळून ‘चोरमले, तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’ असे दोन वेळा म्हणाले. यावेळी बोंडे व चोरमले यांच्यातील वातावरण तापले. बोंडे यांनाच ताब्यात घेण्याच्या सूचना चोरमले यांनी दिल्या. पोलीस वाहनात त्यांना आयुक्तालयात नेण्यात आले.