मुंबई – महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रँड आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले होते. यावरुन राणे बंधुंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबई असो की, महाराष्ट्र एकच ब्रँड, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. तर माजी खासदार निलेश राणेंनीही शिवसेनेवर टीका केली आहे.
आमदार नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड..छत्रपती शिवाजी महाराज असं एका वाक्यात त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.
निलेश राणेंनी ट्विट केले होते, त्यात म्हटलं होतं की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय?? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईसा पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांघकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच म्हटले पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे.
मनसेचीही शिवसेनेला चपराक
ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होती. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली आहे.
तर महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, तेव्हा कृष्णाने जे कर्णाला म्हटलं होतं, त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...तेच आज आम्ही सांगतो. बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला
"बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ"; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक
राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...
काळाची गरज...! नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण; राष्ट्रवादीकडून समर्थन?
CNG पंपाचे मालक होण्याची सुवर्णसंधी! सरकार १० हजार परवाने देणार; आजच करा अर्ज!