नवी दिल्ली : भारतीय घटनेवर तिरस्कार, दुही आणि हिंसा पसरविणाऱ्या शक्तींनी आक्रमण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बोगस अच्छे दिन'च्या सरकारला जनता पर्याय शोधत असून काँग्रेसला ही संधी साधायची आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हटविण्यासाठी देशातील जनता काँग्रेस आणि आघाडीमधील पक्षांकडे आशेने पाहत आहे. लोकांना उद्भवत असलेल्या समस्या एेकणारे आणि त्यावरील उपायांद्वारे गरीबी, बेरोजगारी आणि असमानता कमी करणारे सरकार त्यांना हवे आहे. चांगले जगण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी शेतकरी व युवकांना काँग्रेसच पर्याय दिसत आहे. दुहीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असेही राहुल यांनी सांगितले. मोदी यांचे सरकार भ्रष्टाचार, आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. ते देश चालिवण्यास असमर्थ आहेत. या सरकारला हटविण्यासाठी व जनतेला हवे असलेले सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील, असे राहुल गांधी म्हणाले. भाजप आणि आरएसएस जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून देशाची शक्तीस्थाने असलेल्या संस्थांवर हल्ले करण्यात आले आहेत. आधुनिक भारतामध्ये या संस्थांना लोकशाहीची मंदिरे म्हणून ओळखले जाते. या शक्ती ती उद्धवस्त करत सुटली असल्याचा आरोप राहुल यांनी केला.
जनतेला मोदी यांच्या 'बोगस अच्च्छे दिन' ला पर्याय हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 12:39 PM
भारतीय घटनेवर तिरस्कार, दुही आणि हिंसा पसरविणाऱ्या शक्तींनी आक्रमण केले आहे. दुहीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असेही राहुल यांनी सांगितले.
ठळक मुद्देकाँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांची टीका