नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. उद्या शरद पवार यांचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. यातच, आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी दिली आहे.
खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या, "आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. त्यामुळे जे होईल ते शरद पवारांच्या इच्छेनुसार होईल." दरम्यान, नवनीत कौर राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार आहेत. मात्र. नवनीत कौर राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचे कौतुक केले. तसेच, मोदी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे.
'शरद पवार यूपीएला फायदा करुन देतील, पण भाजपाला काहीही फरक पडणार नाही'शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच यूपीएचे अध्यक्ष झाले तरी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपा मजबूत आहे, मोदींचे नेतृत्व सक्षम आहे. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा यूपीएला निश्चितच फायदा होईल. शरद पवार यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनिअरींगचा ते यूपीएला फायदा करुन देऊ शकतात. पण, याची आम्हाला चिंता नाही. कारण, भाजपाला काहीही फरक पडणार नाही, असे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार?शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे केंद्रीय राजकारणातही शरद पवारांकडे नेतृत्व देत भाजपाला आव्हान उभारण्याचा प्रयत्न यूपीएतील घटक पक्षांचा आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे. शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि यूपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
यूपीए अध्यक्षपदाबाबत शरद पवार काय म्हणाले? शरद पवारांकडे विरोधी पक्षांचे म्हणजेच यूपीएचे नेतृत्व दिले जाऊ शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, स्वत: शरद पवारांनी याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. ''मी यूपीएचे नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही'', असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना दिले आहे.