नवाब मलिकांचा जावई एनसीबीच्या जाळ्यात; ड्रग प्रकरणी चौकशीला बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 12:10 PM2021-01-13T12:10:53+5:302021-01-13T12:11:41+5:30
Nawab Malik news: एनसीबीने वांद्रे आणि चेंबूरमध्ये सोमवारी छापा टाकला होता. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झाची माजी व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून 200 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती.
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबईतील हायप्रोफाईल हस्ती आणि त्यांना ड्रग पुरविणारे एनसीबीच्या रडारवर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईत 200 किलो ड्रग पकडण्यात आले होते. या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जावयापर्यंत जाऊन पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
एनसीबीने वांद्रे आणि चेंबूरमध्ये सोमवारी छापा टाकला होता. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झाची माजी व्यवस्थापक आणि अन्य दोघांकडून 200 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत नवाब मलिकांच्या जावयाचे नाव उघड झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उ़डण्याची शक्यता आहे.
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचे लग्न समीर खान यांच्याशी झाले आहे. समीर यांनी 200 किलो ड्रगमधील मुख्य आरोपी करन सजनानी याच्याकडून 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. दोघांमध्ये गुगल पे वरून व्यवहार झाला होता. यामुळे एनसीबीला या दोघांमध्ये ड्रग खरेदी-विक्री झाल्याचा संशय आहे. याच्या चौकशीसाठी समीर खानला एनसीबीने बोलावले आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ड्रग प्रकरणावरून एनसीबीच्या रडावर अनेक लोक आहेत. मंगळवारी प्रसिद्ध मुच्छड पानवाला रामकुमार तिवारीला अटक करण्यात आली होती. यानंतर पानवालाचा मालक जयशंकर तिवारी आणि रामकुमार यांची काही तास चौकशी करण्यात आली. हे दोघे भाऊ आहेत. तिवारी बंधू दक्षिण मुंबईतील पॉश भाग कँप कॉर्नरवर पानाची दुकान चालवितात. दोघेही सहा सहा महिने हे दुकान सांभाळतात. या पान शॉपवर मोठमोठ्या बॉलिवूड हस्ती पान खाण्यासाठी येतात. यामुळे आतापर्यंत बचावलेले बॉलिवूडकर ड्रग प्रकरणात समोर येण्याची शक्यता आहे.