मुंबई – लेखिका प्रियम गांधी यांनी महाराष्ट्रतील सत्तासंघर्षावर लिहिलेल्या पुस्तकावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती, स्थिर सरकार देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देणार होती, मात्र शरद पवारांनी मन बदललं आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी पार पडला, या संपूर्ण घडामोडीवर हे पुस्तक लिहिल्यानंतर खरचं राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपासोबत बोलणी केली होती का? अशी चर्चा सुरु झाली.
परंतु राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावत हे पुस्तक लेखिकेला पुढे करून देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिल्याचा आरोप केला आहे, नवाब मलिक म्हणाले की, हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांचे आहे, ज्यांनी बेईमानीने सरकार बनवलं त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं काम केले आहे, ज्यापद्धतीने भाजपाने ८० तासाचं सरकार बनवलं, त्यावरुन भाजपाची प्रतिमा मलिन झाली, यावर पडदा टाकण्यासाठी असं पुस्तक समोर आणण्यात आलं, देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आहे. हे पुस्तक लिहण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आलं असा आरोप त्यांनी केला.
काय होतं या पुस्तकात?
मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेत्यांनी वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं त्यांनी फडणवीसांना सांगितले, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने अमित शहांसोबत चर्चा केली, दुसऱ्याच दिवशी दिल्लीत अमित शहा यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांसोबत बैठक झाली, या बैठकीत शरद पवार, अजित पवार, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा उपस्थित होते असं त्यांनी सांगितले.
या बैठकीत शरद पवारांनी स्वत: अमित शहांना भाजपासोबत येण्यास तयार असल्याचं सांगितलं, बैठकीत मुख्यमंत्री कोणाचा असेल आणि मंत्रिमंडळ फॉर्म्यूला कशा असेल यावर सविस्तर चर्चा झाली, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर लोकांची स्थितीचा आढावा पाहून महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे असं सांगत राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर करणार होते, २८ तारखेला शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, त्याचवेळी दुसरीकडे शिवसेना-काँग्रेसही सरकार बनवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र शरद पवारांच्या मनात कधी काय असेल सांगता येत नाही, शिवसेना-काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे जास्तीत जास्त अधिकार येतील यादृष्टीने शरद पवारांनी कदाचित विचार करून पुन्हा मन बदललं असावं, असा दावा लेखिकेने पुस्तकात केला होता.
दरम्यान, शरद पवारांनी निर्णय बदलल्यानंतर अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी विरोध केला, अजित पवारांनी आक्रमकपणे भाजपाला पाठिंबा द्यावा असं म्हटलं, तीन पक्षाचं सरकार चालू शकत नाही त्यामुळे ठरल्याप्रमाणे भाजपाला पाठिंबा द्यावा असं अजित पवारांनी सांगितले, त्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याने पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा अजित पवार ठरल्याप्रमाणे भाजपाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं सांगितलं, फडणवीसांनी अजित पवारांना हे खरं आहे का? असं विचारलं, तेव्हा अजित पवारांनी माझ्यासोबत २८ आमदार असल्याचं सांगितले, त्यानंतर पुढील सर्व घटना घडली होती असंही सांगण्यात आलं आहे.