मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. या कोरोना संकटात बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. बक्सरच्या चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात मृतदेहांचा खच आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनासहित नागरीकांची झोप उडाली. हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आल्याची शक्यता येथील प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष केले आहे. तसेच, यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. (NCP leader nawab malik criticizes bjp over bodies found in ganga river at buxar)
नवाब मलिक यांनी यासंदर्भात रिट्विट केले आहे. रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला राम भरोसे सोडले, अशी टीका नेते नवाब मलिक यांनी केली आहे. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांचे ट्विट नवाब मलिक यांनी रिट्विट केले आहे.
दरम्यान, बक्सरच्या चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात मृतदेहांचा खच आढळून आला आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र यावरून हात झटकले आहेत. सर्व मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहून आले आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे. महादेव घाटाचा परिसर मृतदेहांनी झाकला गेला आहे. या घटनेचा विचलित करणारा व्हिडिओ समोर येताच प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
काय म्हणाले चौसाचे बीडीओ?'चौसाच्या महादेव घाट परीसरात जवळपास ४० ते ४५ मृतदेह आहेत. जे वेगवेगळ्या ठिकाणांहून गंगेत वाहून इथे आले आहेत. हे मृतदेह आमचे नाहीत. आम्ही एक कर्मचारी नेमला आहे. त्याच्या देखरेखीखाली मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यामुळे गंगा नदीत हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत येत आहेत आणि ते अडल्याने इथे आढळून येत आहेत. उत्तर प्रदेशातून येणारे मृतदेह रोखण्यावर आमच्याकडे कुठलाही उपाय नाही आहे. अशा परिस्थितीत या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या तयारी आम्ही करत आहोत', असे चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनी सांगितले.