मुंबई – भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहे. शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सोलापूरात बुधवारी पत्रकार परिषद संपल्यानंतर पुढील कार्यक्रमाला जाताना पवारांच्या एका कार्यकर्त्यांने गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला केला.
गोपीचंद पडळकर गाडीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने थेट मोठा दगड गाडीच्या काचेवर फेकला. या हल्ल्यात गोपीचंद पडळकरांना काही दुखापत झाली नसून गाडीच्या काचेचे नुकसान झालं आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकरांचा समाचार घेतला. शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेते आहेत. त्यांच्यावर खालच्या शब्दात टिका करणं शंभर टक्के चुकीचे आहे. यापुढे अशी विधानं खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी पडळकरांना दिला.
याबाबत निलेश लंके म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर जे काही म्हणाले ते शंभर टक्के चुकीचे आहे. महाराष्ट्राची भूमी महिलांचा मानसन्मान करणारी आहे. एखाद्या लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे वक्तव्य करणं शोभत नाही. गोपीचंद पडळकरांनी यापुढे बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्य यापुढे खपवून घेणार नाही असं लंके यांनी पडळकरांना सांगितले आहे.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
मी लहान असल्यापासूनच शरद पवार हे गेल्या ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पुढच्या ३० वर्षांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत'. पण त्यांचे या राज्यात तीन चारच खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. मात्र, असे असताना, कोंबड्याला काय वाटते, की मी ओरडल्याशिवाय, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही, असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पण, 'रात गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी परिस्थिती या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी असाच दबा धरून बसावं. पुढच्या लवनात कधी तरी यांना ससा सापडेल, कधी तरी त्यांनी टपून बसावं, याबद्दल माझी काही हरकत नाही अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली होती.
शरद पवारांना मोठा नेता मानत नाही आणि तुम्ही...
शरद पवार हे साडे तीन जिल्ह्यांचे स्वीमी आहे. त्यांचे तीन खासदार आहेत. त्यांना मोठं कोण मानणार? तुम्ही कुणी मानत असाल तर त्याच्याशी मला देणे-घेणे नाही. मी त्यांना मोठा नेता मानत नाही. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्द्यांवर बोलतो. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या घरच्यांनी मुद्द्यांवर उत्तर द्यावं, ही विचारांची देवाण घेवाण आहे. असा टोलाही पडळकर यांनी पवारांना लगावला होता.
प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला
प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला, या शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी या दगडफेकीचं वर्णन केले आहे. पण अशा भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल... घोंगडी बैठका सुरूच राहणार..., असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. मात्र, या ट्विटसह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि एका कार्यकर्त्याचा फोटो पडळकर यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे पडळकर यांचा रोख रोहित पवार यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे.