मोदींच्या 'त्या' दोन मंत्र्यांबद्दल सुप्रिया सुळे कौतुकानं बोलल्या; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या
By कुणाल गवाणकर | Published: September 21, 2020 10:23 PM2020-09-21T22:23:07+5:302020-09-21T22:25:03+5:30
काँग्रेसकडून सातत्यानं टीका होत असलेल्या मंत्र्यांचं सुळेंकडून कौतुक
नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यानंतर करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे सर्वसामान्यांना भोगावा लागलेला त्रास, अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था यावरून विरोधक सातत्यानं मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. यावरूनही विरोधकांनी सीतारामन यांच्यावर टीका केली. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं २० लाख कोटींचं पॅकेज किती जणांपर्यंत पोहोचलं, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार उपस्थित केला. मात्र काँग्रेसनं सातत्यानं टीका केलेल्या सीतारामन यांचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज संसदेत कौतुक केलं. त्यामुळे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद
'निर्मला सीतारामन यांचं मंत्रालय नेहमी इतर विभागांपेक्षा चांगली कामगिरी करतं. आमचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात. पण मला अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांच्या कामाचं कौतुक करावंसं वाटतं. ते सातत्यानं विधेयकं सादर आणून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दांत सुळेंनी अर्थमंत्री सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं कौतुक केलं. सुळेंच्या या स्तुतीसुमनांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
We may have strong disagreements but I would like to compliment Finance Minister & her MoS that they are two people who constantly come with Bills to try and fix things which really need fixing at urgency: Supriya Sule, NCP MP in Lok Sabha https://t.co/OhU48qVVk7
— ANI (@ANI) September 21, 2020
विशेष म्हणजे लोकसभेत अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या सुप्रिया सुळे संसदेबाहेर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या. काल राज्यसभेत प्रचंड गदारोळात शेतीशी संबंधित दोन विधेयकं मंजूर झाली. सरकारनं आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता कामकाज रेटून नेलं आणि विधेयकं मंजूर केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे खासदार संसदेबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.
Participated in the protest outside the Parliament today against the manner in which Farm Bills were passed in Rajya Sabha. pic.twitter.com/s6zzmYKexp
— Supriya Sule (@supriya_sule) September 21, 2020