बुलडाण्याचे नवे पालकमंत्री संजय कुटे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 07:52 PM2019-07-05T19:52:21+5:302019-07-05T20:02:46+5:30
काढलेल्या परिपत्रकानुसार आठ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जामोद - बुलडाणा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून कामगार मंत्री ना.डॉ.संजय कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी, ५ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार आठ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डॉ.संजय कुटे, वर्धाचे चंद्रशेखर बावनकुळे, अमरावतीचे डॉ.अनिल बोंडे, भंडारा व गोंदीया जिल्ह्याचे डॉ. परिणय फुके, गडचिरोलीचे सुधीर मुनगंटीवार, हिंगोलीचे अतुल साबे, तर पालघरचे पालकमंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाण्याचे पालकमंत्री म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील मदन येरावार यांचेकडे पदभार देण्यात आला होता. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर हा पदभार येरावार यांचेकडे आला होता. आता डॉ.संजय कुटे यांना बुलडाणा जिल्ह्यातून मंत्रीपदाची संधी मिळाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती अपेक्षित होतीच. त्याप्रमाणे शुक्रवार ५ जुलै रोजी सामान्य प्रशासनाने आदेश काढून आठ जिल्ह्यातील पालकमंत्री नेमण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविली आहे. ती समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.
- डॉ.संजय कुटे, पालकमंत्री, बुलडाणा