मुंबई – काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येत आहे, यात विधानसभा अध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांना राजीनामा द्यायला सांगून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती.
नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे, तत्पूर्वी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पटोले आणि राऊत यांच्या खांदेपालट होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांपासून के. सी पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरु होती, यातच आता संग्राम थोपटे हे नवीन नाव पुढे आलं आहे.
भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी होत आहे. प्रदेशाध्यक्षपदी विदर्भाला मान दिल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्राला अध्यक्षपदाचा मान देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न काँग्रेस हायकमांडकडून होऊ शकतो. ठाकरे मंत्रिमंडळात संग्राम थोपटे यांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली होती, मात्र ते कार्यकर्ते माझे नाहीत असं थोपटेंनी स्पष्ट केले होते, मंत्रिपद हुकल्याने आता त्यांना विधानसभा अध्यक्षपदी संधी देणार का? हे पाहणं गरजेचे आहे, याबाबत टीव्ही ९ने बातमी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला होता, त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास कोणी तयार नव्हतं, त्यात बाळासाहेब थोरात यांच्यावर हायकमांडने विश्वास दाखवत त्यांच्यावरही ही जबाबदारी टाकण्यात आली होती, त्यानंतर राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळालं, सत्तेत येण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली होती, आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांना संधी देण्यात आली आहे, पण पटोले फक्त प्रदेशाध्यक्षपद सांभाळणार की त्यांना मंत्रिपदही मिळणार हे आगामी काळात कळेल, परंतु तुर्तास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे खातं नाना पटोलेंना मिळेल आणि राऊत यांना अध्यक्षपद दिलं जाईल असंही सांगण्यात येत आहे. परंतु नितीन राऊत मंत्रिपद सोडतील का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.