"महाराष्ट्रात कुठल्याही गृहमंत्र्याने पोलिसांवर एवढा अविश्वास दाखवला नव्हता" त्या विधानावरून फडणवीसांचा अनिल देशमुखांना टोला
By बाळकृष्ण परब | Published: September 21, 2020 04:24 PM2020-09-21T16:24:07+5:302020-09-21T16:27:08+5:30
काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.
मुंबई - राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांनी केला होता, असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतील केले होते. मात्र या विधानाबाबत नंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले. पण या विधानामुळे गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. आता विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.
अनिल देशमुख यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या कुठल्याही गृहमंत्र्याने पोलिसांवर असा अविश्वास दाखवला नव्हता. आम्ही सत्तेत आलो तेव्हाही आधीच्या काळातीलच पोलीस होते. मात्र आम्ही त्यांना सोबत घेत चांगल्या प्रकारचे काम केले. सरकार सांगते त्याप्रमाणे पोलिसांना काम करावे लागते.
आता आपण तसं विधान केलं नसल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता त्यांना संशयाचा फायदा देऊया. पण गृहमंत्र्यांच्या बोलण्याचा असा अर्थ निघणे हे काही योग्य नाही. स्वत: पोलिसांवर अविश्वास दाखवायचा आणि दुसऱ्यांनं म्हटलं की महाराष्ट्राचा अवमान झाला म्हणून कांगावा करायचा, हे योग्य नाही, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले होते अनिल देशमुख
काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती. लोकमत ऑनलाइनच्या ह्यग्राउंड झीरोह्ण कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले होते. सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले होते की, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.
नंतर या विधानाचा केला इन्कार
पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्नह्ण, या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खळबळजनक मुलाखतीचे पडसाद राज्यभर उमटले होते. नंतर मात्र, देशमुख यांनी ह्यत्याह्ण विधानाचा इन्कार केला असून आपल्या तोंडी ते वक्तव्य टाकले, असा खुलासा
केला होता. माझ्या तोंडी चुकीच्या पद्धतीने ते वक्तव्य टाकण्यात आले, असा खुलासा गृहमंत्री देशमुख यांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघात बोलताना केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी