पिंपरी चिंचवड – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी अचानक पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी प्रशासनाच्या वैद्यकीय असुविधेबद्दल खंत व्यक्त केली. जम्बो कोविड रुग्णालयात नेमके कसे उपचार केले जातात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो वा सामान्य.. कोणाचाही बळी जायला नको असं शरद पवारांनी बजावलं
तसेच कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करुनही काही ठिकाणी डॉक्टर्स नाही, नर्स नाही, औषधे नाहीत अशा अनेक तक्रारी येत आहेत. काही अती करतात पण असं घडता कामा नये अशा शब्दात शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. गुरुवारी शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराला ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. पवार यांनी यावेळी महापालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट देत शहरातील कोरोना रुग्णसंख्या, सर्व्हेक्षण, उपाययोजना आदी परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. मात्र, ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरची पाहणी करण्याचे त्यांनी टाळले.
दरम्यान, जम्बो कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुना वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी पुण्यातील मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे. गुरुवारी त्यांनी मनसे स्टाईल आंदोलन करीत थेट गेटवरुन चढून जम्बो सेंटरमध्ये प्रवेश केला. विभागीय आयुक्तांनाही त्यांनी यावेळी रुग्णांच्या हेळसांड होत असल्याबद्द्ल जाब विचारला.
जम्बो सेंटरमधील नियोजनाच्या अभावामुळे तसेच पीएमआरडीए आणि पालिकेमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूमुळे अन्य रुग्ण घाबरले असून येथील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरही घाबरले असल्याचे पाटील म्हणाल्या. जम्बो सेंटरची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाटील यांना गेटवरच बाऊन्सरने अडविले. त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे ॠषीकेश बालगुडे व अन्य कार्यकर्ते होते. बाऊन्सर आतमध्ये सोडत नसल्याने त्यांनी थेट गेटवर चढून आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ सर्व कार्यकर्ते आतमध्ये गेले.
स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्था सुरु करा
एका पत्रकाराचा व्यवस्थेतील त्रुटींमुळे प्राण जाणे हे दुर्दैवी असून ही घटना पालिकेसाठी लाजीरवाणी आहे. शहरात सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टर व सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध असतानाही त्यांच्यामध्ये समन्वय नाही. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचार वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असून पालिकेने स्वतंत्र यंत्रणा (कक्ष) उभारणे गरजेचे आहे. जिथे सामान्य नागरिकांवर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. - दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या
वैद्यकीय सुविधा पुरवणे स्थानिक पालिका सत्ताधाऱ्यांचे काम
पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास पालिकेचा अकार्यक्षम कारभार जबाबदार असून या कारभाराचा निषेध नोंदवीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या आरोग्य पथकाने दिलेल्या निर्देशानुसार, पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने पुणेकरांसाठी अत्यंत कमी कालावधीमधे जंम्बो कोविड सेंटर उभे केले. येथील रुग्णांना उपचार, वैद्यकीय सेवा, सुविधा पुरवणे हे स्थानिक प्रशासनाचे काम आहे. स्थानिक प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केला.