ठळक मुद्देपहिल्यांदा तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतोकाही महिन्यांनंतर माझे कुटुंब माझी जबाबदारीअजून काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा मी राहतो घरी
मुंबई - गेल्या सहा सात महिन्यांपासून राज्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव आता कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. पण राज्यात कोरोनावरून राजकारण मात्र जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी सुरू केलेल्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या अभियान सुरू केले आहे. दरम्यान, या अभियानावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. आता म्हणताहेत की माझे कुटुंब माझी जबाबदारी. आता अजून काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा मी राहतो घरी, असं म्हणतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
दरम्यान, गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची सुरुवात केली होती. कोरोनाला घाबरण्याचं काम नाही पण खबरदारी घ्यायला हवी. जबाबदारी तुमच्या खांद्यावरही टाकणार आहे. काही गोष्टींची खबदारी तुम्ही घ्यायची आहे. आम्हीदेखील काही खबरदारी घेऊ. येत्या १५ तारखेपासून जो कोणी महाराष्ट्रावर प्रेम करतो, मुंबईला आपलं मानतो, त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावं. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे मोहिमेचं नाव आहे. महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या सुरक्षेसाठी तोंडावर मास्क घालून फिरलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले होते.गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत चालली आहे. काल राज्यात कोरोनाच्या १० हजार २४४ नव्या रुग्णांचे निदान झाले होते. तर २६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे १४ लाख ५३ हजार ६५३ रुग्ण सापडले आहेत. तर ३८ हजार ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे.