कागल : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना खंडणी वसुलीच्या कथीत गुन्ह्यात सीबीआयने प्रथमदर्शनी क्लीनचिट आहे. आता "दूध का दूध आणि पाणी का पाणी" झाले आहे. तेव्हा खाकी वर्दीतील दरोडेखोर असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या परमबीर सिंगला सीबीआयने त्वरीत अटक करावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे केली.
कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुश्रीफ म्हणाले परमबीर सिंग यांना हाताशी धरून आरोप करायला लावून राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाने केले होते. उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की, १५ दिवसाच्या आत सीबीआयने प्राथमिक अहवाल द्यावा आणि त्यामध्ये जर देशमुख दोषी आढळतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. मात्र ते निर्दोष आहेत. त्यांच्याविरुद्ध खंडणी गोळा करण्याचा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. उलट परमबीर सिंग यांनीच सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीमध्ये घेतलं. त्यांना उच्चपदाची नियुक्ती दिली. वाझे हे सतत परमवीर यांच्या सोबत होते.
स्फोटकांच्या तपासाचे काय झाले?
मुकेश अंबानीच्या बंगल्यासमोर स्फोटके ठेवण्या मागे परमबीर सिंग यांचाच हात आहे , असे मी गेली सहा महिने ओरडून सांगत आहे. ही स्फोटके कोणी ठेवली. याचा मास्टरमाइंड कोण, याचा उद्देश काय ? या बद्दल महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहीजे. परंतु अद्यापही राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्याचा शोध लागलेला नाही.