मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. सामनासाठी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे, या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केल्याचं या टिझरमधून पाहायला मिळतं.
या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी यासाठीच केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)
मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप सत्ताधारी नेत्यांचा आहे.
देशाच्या राजकारणात मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडल्यानंतर त्याठिकाणी भाजपाचे सरकार स्थापन करण्यात आले, ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन त्यांच्या समर्थकांना मंत्रिपदे देण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार अल्पमतात गेले. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मध्यप्रदेशात सरकार स्थापन केले. यानंतर अलीकडेच राजस्थानमध्ये सुरु असलेल्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. (Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)
राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानंतर तेथील अशोक गहलोत सरकारवर संकट निर्माण झालं आहे, राजस्थानात काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान यानंतर भाजपाचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळणार असल्याचंही काही नेत्यांकडून दावा केला जातो, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चेवरुन विरोधकांना खुलं चॅलेंज दिलं आहे.