नवी दिल्ली: पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरू असलेल्या गोंधळावरुन केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सत्तेत असताना काँग्रेस हेरगिरीमध्ये जेम्स बॉन्ड होती, आता विरोधी पक्षात आल्यानंतर संसदेत गोंधळ घालून संसदेचा वेळ घालवण्याचा प्रकार सुर आहे, अशी टीका नकवी यांनी केली.
काँग्रेसला खोट्या आणि चुकीच्या मुद्यावर संसदेचा वेळ वाया घालवायचा आहे असेही नकवी म्हणाले. तसेच, काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षंना रँट अँड रन (आरोप लावून पळून जाणे) चा आरोपही केला. याशिवाय, जतनेच्या हिताच्या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून, 13 ऑगस्टपूर्वी अधिवेशन संपवले जाणार, या अफवांचेही खंड केले. यावेळी नकवी यांनी संसदेची कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी विरोधकांच्या संपर्कात असल्याचंही सांगितलं.
विरोधकांना चर्चा नकोय
सरकार पेगासस प्रकरणावर चर्चा करण्यास तयार झाल्यावरच विरोध संपेल, अशी भूमिका विरोधकांची आहे. यावर बोलताना नकवी म्हणाले की, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष रँट अँड रनच्या फॉर्म्युल्यावर काम करत आहे. आरोप करायचा गोंधळ घालायचा आणि पळून जायच. यांना चर्चा नको, फक्त गोंधळ हवाय. अधिवेशनात सुरुवातीला यांनी कोरोनाचा मुद्दा उपस्थित केला, नंतर मध्येच हा मुद्दा सोडून शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सुरू केला, त्यानंतर आता पेगाससवर गोंधळ घालत आहेत. यांना एकाही मुद्यावर नीट चर्चा करायची नाहीये. त्यांना फक्त गोंधळ घालून संसदेची कार्यवाही बंद पाडायची आहे, असा आरोपही नकवी यांनी केला.