- राजेश शेगोकार, अकोला
जिनके घर शिशे के होते है, वो दूसरो पे पत्थर नही मारा करते...हिंदी चित्रपटातील हा संवाद दार्शनिक ठरला आहे. राजकारण या क्षेत्राला तर तो चपखलपणे आरसा दाखवितो. हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या अकोल्यात भारिप-बमंस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांची दगडफेक ही काचेच्या घरात राहणाऱ्यांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे. या आरोपांच्या सत्राला निमित्त ठरले ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व भारिप-बमंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांवर केलेले आरोप.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी जाहीर करताच काँग्रेसने आघाडीसाठी आंबेडकरांची गळाभेट घेतली. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेससोबत आघाडी करू; पण राष्ट्रवादी सोबत नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे जातीयवादी आहेत, अशी बोचरी टीका केली. साहजिकच पवारांनी तत्परतेने पलटवार करून आंबेडकरांना त्यांच्या दोन निवडणुकांचे स्मरण करून दिले. ज्यावेळी आंबेडकरांनी पाठिंबा घेतला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? असा सवाल उपस्थित केल्यावर पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. अशी भूमिका आंबेडकरांनी घेतल्यावर सध्या राज्यभर आरोप-प्रत्यारोपाचे मोहळ उठले आहे. अकोला ही आंबेडकरांची राजकीय राजधानी त्याला अपवाद कशी ठरेल. अकोल्यात राष्ट्रवादीच्या झाडून सर्व नेत्यांनी एकत्र येत आंबेडकरच खोटे असे हे पत्रकार परिषदेत ठासून सांगितले. या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांची भूमिका अतिशय आक्रमक होती, त्यामुळे त्यांनाच टार्गेट करीत दुसऱ्या दिवशी भारिपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीच्या नेत्यांची वैचारिक पातळीच काढली. या पृष्ठभूमीवर पश्चिम वऱ्हाडाच्या राजकारणाचा आढावा घेतला तर या दोन्ही पक्षांनी कधी ना कधी एकमेकांना सहकार्य करून सत्ता उपभोगल्याचे स्पष्ट होते.
अकोला जिल्हा परिषदेच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर भारिप-बमसंला कधीही एकहाती सत्ता मिळालेली नाही. प्रत्येक वेळी त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षाचा टेकू घ्यावा लागला, तर कधी अपक्षांना हाताशी घ्यावे लागले. यामध्ये भारिपाला काँग्रेस सोबत राष्ट्रवादीचेही वावडे नव्हतेच. सध्याही अकोला जिल्हा परिषदेत भारिपला राष्ट्रवादीचा टेकू आहेच. इतकेच नव्हे तर पुंडलिकराव अरबट यांच्या रूपाने सभापती पदही राष्ट्रवादीला दिले आहे. शरद पवार जातीयवादी आहेत, तर मग त्यांचा पक्ष जिल्हा परिषेदच्या सत्तेत भारिपला कसा चालतो? या प्रश्नाचा दगड राष्ट्रवादीने भारिपच्या घरावर मारला आहे. दुसरीकडे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीवर भारिपने आगपाखड केली आहे. गुलाबराव गावंडे हे शिवसेनेचे विदर्भातील सर्वाधिक आक्रमक नेते. थेट बाळासाहेबांचे लाडके अशी त्यांची ओळख व ख्याती होती. त्यांनीही सेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पुन्हा सेना व आता पुन्हा राष्ट्रवादी अशी संगीत खुर्ची खेळली आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेते पक्षांतर करून आले आहेत, तर काहींची छुपी युती लपलेली नाही. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेतही; मात्र सरसकट साधन शुचिता कुठल्याच पक्षात नसल्याने राष्ट्रवादीने फेकलेले आरोपांचे दगड हे साहजिकच त्यांच्याच काचेच्या घरावर पडले आहेत.
या आरोप सत्रामुळे सध्या राजकारणाचा पेंडुलम हलता आहे. जनतेचे मनोरंजन होत आहे. उद्या राष्ट्रवादीला सोबत घेत काँग्रेसने आंबेडकरांची आघाडीसाठी मनधरणी करून त्यांना मनवले, तर याच नेत्यांची मोठी अडचण होणार आहे. आज एमेकांवर दगडफेक करणाऱ्यांनाच उद्या तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू ‘मतां’च्या माळा म्हणत गळाभेट घ्यावी लागणार आहे. कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू अन् मित्र असत नाही.