ठळक मुद्देभाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीबाबत एक सनसनाटी ट्विट करून उडवली खळबळ रश्मी शुक्ला यांनी दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे घेतले नाव राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला
मुंबई - गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आले आहे. दरम्यान, या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अहवाल सादर केला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र रश्मी शुक्ला ह्या कोरोनाचे कारण देत चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. मात्र त्यांनी सीबीआयसमोर झालेल्या चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले असून, त्यांनी दोन अनिल, त्यांचे निकटवर्तीय आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतले असल्याचा दावा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. (Rashmi Shukla names two Anil and one big leader in CBI probe, Claim of BJP MLA Atul Bhatkhalkar)
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीबाबत एक सनसनाटी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. या ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले की, आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये झालेल्या सीबीआय चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतले आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ ठेवण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ, त्यानंतर या स्कॉर्पिओचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांची झालेली हत्या, या दोन्ही प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा आढळलेला सहभाग, मग परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि नंतर बदल्यांच्या रॅकेटबाबतच्या संभाषणाचा ६.१ जीबी डेटा आपल्याकडे असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले होते. दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. त्या प्रकरणात शुक्ला यांनी अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील मंत्र्यांकडून करण्यात आला होता. तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात सीताराम कुंटे यांनी दिलेल्या अहवालात नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्यावर काही जणांचे पोन टॅप करण्याची परवानगी रश्मी शुक्ला यांनी घेतली होती असे म्हटले होते. त्यानंतर फोन टॅपिंगची कागदपत्रे उघड केल्याबद्दल एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.