राजस्थानमध्ये माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या सचिन पायलट यांनी बंडखोरी करत काँग्रेसचे गेहलोत सरकार (Ashok Gehlot Government) उलथविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सत्तास्थापनेपासून सत्ता टिकविण्यापर्यंत मित्र पक्षांनी साथ दिली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे हे मित्रपक्ष गेहलोत सरकारला सोडचिठ्ठी देऊ लागल्याचे चित्र आहे.
पंचायत निवडणुकीत भाजपाकडून मिळालेल्या पराभवाच्या झटक्यानंतर गहलोत सरकारसमोर मित्रपक्षांना टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) ने काँग्रेस सरकारला दिलेले समर्थन मागे घेतले आहे. बीटीपीच्या दोन आमदारांनी गहलोत सरकारला समर्थन दिले होते.बीटीपीचे दोन आमदार राजकुमार रोत आणि रामप्रसाद यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि गुजरातचे आमदार महेश वसावा यांच्याकडे काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याची मागणी केली होती. यावर हिरवा कंदील येताच त्यांनी पाठिंबा काढल्याचे स्पष्ट केले आहे. सत्तास्थापनेपासून सत्तासंघर्ष काळात आणि राज्यसभा निव़डणुकीतही दोघांनी काँग्रेसचे उमेदवार के सी वेनुगोपाल आणि नीरज डांगी यांना मतदान केले होते. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीने त्यांना काँग्रेसशी संबंध तोडण्यास भाग पाडले आहे.
राजस्थानच्या आदिवासी भागातील डूंगरपुरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बीटीपीला ( Bharatiya Tribal Party) सर्वाधिक मते मिळाली होती. मात्र, काँग्रेस आणि भाजपाने हातमिळवणी करत बीटीपीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविण्यापासून रोखले. इथे भाजपाचा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आला आहे. यामुळे बीटीपी नाराज झाली आहे.
गेहलोत सरकार संकटात? सचिन पायलट यांच्या बंडाची हवा काढणाऱ्या काँग्रेसला बीटीपी गेल्याने फारसे नुकसान होणार नाही. आताही काँग्रेसकडे मोठे बहुमत आहे. मात्र, काही जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. राजस्थानमध्ये एकूण २०० विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी गहलोत सरकारकजे ११८ आमदार आहेत. यात काही अपक्ष आमदारही आहेत.
भाजपने १,०११, तर काँग्रेसने जिंकल्या १ हजार जागापंचायत समितीसाठी २१ जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीत ४ हजार ३७१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १ हजार ११ तर काँग्रेसने १ हजार जागा जिंकल्या. २८७ अपक्ष उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ४८ जण विजयी झाले. या निवडणुकीसोबत जिल्हा परिषदेच्या ६३६ जागांसाठीही निवडणूक झाली. सत्ताधारी काँग्रेसने १० तर भाजपने ३ जागा जिंकल्या. मतमोजणी अजूनही सुरू आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. जिल्हा परिषदेच्या १,७७८ उमेदवारांचे व पंचायत समित्यांतील १२ हजार ६६३ उमेदवारांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे. मतदान २३ व २७ नोव्हेंबर व एक व पाच डिसेंबर रोजी झाले.