चहाच्या मळ्यात मतांचे राजकारण; चहापत्ती वेचणारे हात काेणाला देणार मत?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 06:05 AM2021-03-27T06:05:13+5:302021-03-27T06:05:47+5:30
भाजपने २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत या परिसरातील ७ पैकी ४ जागा जिंकल्या हाेत्या, तर २०१९ मध्ये या सर्व जागा कायम ठेवण्यातही भाजपला यश मिळाले.
गुवाहाटी : काेट्यवधी लाेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून हाेते. या चहासाठी लागणारी चहापत्ती ज्या ठिकाणाहून येते त्या आसाममधील राजकारण सध्या चहामय झाले आहे. आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये तब्बल आठ लाखांहून अधिक मतदार असून, प्रत्येक राजकीय पक्ष त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
आसाममध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणूक हाेणार आहे. एकूण १२६ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील ४७ जागांसाठी २७ मार्चला मतदान हाेणार आहे. त्यापैकी ३८ मतदारसंघ हे चहाचे मळे असलेल्या जाेरहाट, गाेलाघाट, शिवसागर, दिब्रूगढ, टिनसुकिया, विश्वनाथ आणि साेनितपूर या जिल्ह्यांमध्ये आहे. या जिल्ह्यात चहाचे मळे तब्बल ८५० असून, आठ लाखांहून अधिक कामगार त्याठिकाणी आहेत. म्हणूनच सर्व राजकीय पक्षांना चहाच्या मळ्यांनी खुणावले आहे.
भाजपने २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत या परिसरातील ७ पैकी ४ जागा जिंकल्या हाेत्या, तर २०१९ मध्ये या सर्व जागा कायम ठेवण्यातही भाजपला यश मिळाले. केंद्रीय अर्थसंकल्पातही चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक हजार काेटींचे पॅकेजही जाहीर करण्यात आले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या भागात यावेळी पाच प्रचार सभा घेतल्या आहेत. काँग्रेसचा यंदा या क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांना पुन्हा काबीज करण्यासाठी जाेरदार प्रयत्न दिसून येत आहे.
लव्ह अँड लँड जिहाद रोखण्यासाठी कायदा करणार : शहा
कमालपूर : आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास लव्ह अँड लँड जिहादच्या धोक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे सांगितले. एका सभेत बोलताना ते म्हणाले की, आसामची संस्कृती आणि सभ्यता मजबूत करण्यासाठी योग्य कायदा व धोरणे तयार केली जातील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एआययुडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांना आसामची ओळख, प्रतिनिधी बनविले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी हे एक पर्यटक असून केवळ निवडणुकीत ते दोन ते तीन दिवस राज्यात येतात, नंतर पाच वर्षे गायब होतात, अशी टीकाही त्यांनी केली.