Pooja Chavan Death Case: संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केला पॉलिटिकल गेम?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 08:24 AM2021-03-03T08:24:34+5:302021-03-03T08:29:18+5:30

Pooja Chavan Death Case: पूजा चव्हाण प्रकरणात अडचणीत आलेल्या संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दिला. तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच आहे.

Pooja Chavan Death Case cm uddhav thackeray still not sent sanjay rathods resignation to governor | Pooja Chavan Death Case: संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केला पॉलिटिकल गेम?

Pooja Chavan Death Case: संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केला पॉलिटिकल गेम?

Next

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी तीन दिवसांपूर्वी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाल्यानं त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता. त्यातच सोमवारपासून (१ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असल्यानं विधिमंडळात विरोधकांकडून या विषयावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) राठोड यांचा राजीनामा घेतला.

5 कोटी घेतल्याचे आरोप भोवले; शांता राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरीही तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारून ३ दिवस होत आले आहेत. मात्र राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला गेलेला नाही.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धाव

नेमकी प्रक्रिया काय?
एखाद्या मंत्र्यानं पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्यावर मुख्यमंत्री कार्यालय तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवतं. त्यानंतर राज्यपाल तो राजीनामा स्वीकारतात. त्यानंतर संबंधित मंत्री पदावरून दूर होतो. मग सरकारकडून एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं जातं. संबंधित खात्याचा पदभार कोणाकडे सोपवण्यात आला, याची माहिती त्यात असते.

पूजा चव्हाण प्रकरणी गूढ अखेर उघडलं; शवविच्छेदन अहवालातून मिळाली महत्त्वाची माहिती

राठोड अजूनही मंत्रिपदी
मुख्यमंत्री कार्यालयानं राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेलाच नाही. सरकारकडून कोणतंही नोटिफिकेशन काढण्यात आलेलं नाही. वनमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे, याबद्दल सरकारनं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अजूनही वन मंत्रिपदावर कायम आहेत.

राठोड यांचा राजीनामा केवळ फार्स?
मुख्यमंत्री कार्यालयानं राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला नसल्यानं रविवारी घेण्यात आलेला राजीनामा निव्वळ फार्स होतो का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला का, अशी चर्चा रंगू लागली आहे. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
पूजा चव्हाण प्रकरणात झालेल्या आरोपांमुळे संजय राठोड अडचणीत आले. राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटो व्हायरल झाले. कथित ऑडिओ क्लिपमुळेदेखील राठोड यांच्या समस्या वाढल्या. राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपनं घेतला. त्यानंतर रविवारी राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्याच संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राठोड यांचा राजीनामा काही फ्रेम करून लावण्यासाठी घेतलेला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

Web Title: Pooja Chavan Death Case cm uddhav thackeray still not sent sanjay rathods resignation to governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.