नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,16,13,993 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,649 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 593 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,23,810 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात कुपोषणाची समस्या देखील पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर निशाणा साधला आहे.
"डबल इंजिनची फसवाफसवी! पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलं" असं म्हणत प्रियंका गांधींनी (Congress Priyanka Gandhi) टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "संसदेत भाजपा सरकारच्या मंत्र्याने सांगितले की, देशात सर्वाधिक कुपोषित मुलं (जवळपास 4 लाख) उत्तर प्रदेशमध्ये आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री स्वतःच स्वतःला नंबर वन म्हणत आले आहेत आणि "डबल इंजिन"ची फसवाफसवी करून कुपोषणात उत्तर प्रदेशला नंबर वन बनवलं" अशा शब्दांत प्रियंका यांनी जोरदार टीका केली आहे.
"...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले"; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
ऑक्सिजनवरून देशात राजकारण तापलं होतं. त्यावेळी प्रियंका गांधींनी मोदी सरकारला चांगलंच सुनावलं.कोरोना काळात देशात अधिक मृत्यू का झाले याचं कारण सांगत गंभीर आरोप केला होता. "कोरोना संकटाच्या काळात सरकारने ऑक्सिजनच्या निर्यातीत 700% वाढ केली. त्यामुळे मृत्यू झाले. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नव्हती. सशक्त गट आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष करून ऑक्सिजन देण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीही सक्रियता दाखवली नाही" असं प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
"भाजपाच्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे"; प्रियंका गांधी संतापल्या
काही दिवसांपूर्वी ब्लॉक प्रमुख निवडणुकीसाठी अर्ज भरण्यादरम्यान गैरवर्तन झालेल्या महिलेची प्रियंका यांनी भेट घेतली होती. तसेच "भाजपाच्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे" अशी मागणी देखील त्यांनी केली. प्रियंका गांधी अनिता यादव यांची भेट घेण्यासाठी अचानक आल्या होत्या. "एक महिला असल्याने मी अनिताला भेटायला आले आहे. मी येथे राजकीय नेता म्हणून आलेली नाही" असं देखील म्हटलं होतं. प्रियंका गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या भेटीसंदर्भातील काही फोटो शेअर केले होते. तसेच उत्तर प्रदेश काँग्रेसने देखील प्रियंका यांच्या लखीमपूर भेटीचे फोटो शेअर करून "पक्षानुसार नाही तर दु:खानुसार नाते जपणाऱ्या नेत्याचे नाव प्रियंका गांधी आहे" असं म्हटलं होतं.