पंतप्रधान मोदी, अमित शहा निवडणूक आयोगाच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 06:24 AM2019-04-25T06:24:57+5:302019-04-25T06:25:26+5:30
रोड शोची माहिती मागविली; राहुल गांधींच्या वक्तव्याचीही घेतली दखल
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी अहमदाबाद येथे मंगळवारी मतदान केल्यानंतर शहरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीपमधून मिरवणूक काढल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने गुजरातमधून मागविला आहे. मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसने केल्यानंतर आयोगाने ही माहिती मागविली. त्यामुळे आयोग आता पंतप्रधानांवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत भारतीय हवाई दलाचे वर्णन ‘मोदी यांचे हवाई दल’ केले होते. त्याचीही दखल आयोगाने घेतली असून, त्यांच्या भाषणाचीही माहिती आयोगाने मागविली असल्याचे निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर वेळावेळी केलेल्या वक्तव्यांविषयीही निवडणूक आयोगाने माहिती पाठविण्याच्या सूचना संबंधित राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मोदी यांच्या मंगळवारच्या रोड शोविषयी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मतदानाच्या दिवशी मोदी यांची काढलेली मिरवणूक व त्याप्रसंगी त्यांनी केलेले भाषण आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मोदी यांना दोन किंवा तीन दिवसांची प्रचारबंदी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केली होती. मोदी यांनी लातूरमधील जाहीर सभेत तरुण मतदारांना उद्देशून पुलवामामधील शहिदांसाठी तुम्हाला मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते. त्या भाषणाची प्रत आयोगाकडे आली असून, त्याची तपासणी केली जात आहे.
ही होती वादग्रस्त वक्तव्ये
मोदी यांच्याविषयीच्या तक्रारींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून विलंब का होत आहे, असा सवाल केला असता, संदीप सक्सेना म्हणाले की, या सर्व तक्रारी १६ एप्रिलपर्यंत दाखल झाल्या आहेत.
निवडणुकांच्या कामांमुळे मोदींच्या भाषणांच्या प्रती मिळण्यास विलंब झाल्याने कारवाईस उशीर होत आहे, असे निवडणूक उपायुक्तांनी सांगितले. हवाई हल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहनही मोदींनी केले होते. शबरीमालावरून डावे व मुस्लीम पक्ष घातक राजकारण खेळत आहेत, असेही मोदी म्हणाले होते.