मुंबई – कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना मनसेला जोरदार धक्के बसले आहेत. सोमवारी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला, त्यापाठोपाठ मनसेचे गटनेते आणि माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीही मनसेला रामराम केला, कदम आणि हळबे यांच्या पक्ष सोडण्याने मनसेला डोंबिवलीत मोठं खिंडार पडल्याचं चित्र निर्माण झालं.
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात डोंबिवलीचा काही भाग येत असल्याने मंदार हळबे आणि राजेश कदम यांच्या पक्ष सोडण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राजेश कदम हे मनसेचे संस्थापक सदस्य होते, अनेक आंदोलनात त्यांनी सत्ताधारी शिवसेनेविरोधात भूमिका घेत रस्त्यावर उतरले होते, मात्र सोमवारी अचानक राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितले.
प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया
तर दुसरीकडे मंदार हळबे यांनीही मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, मंदार हळबे यांना मनसेने दोनदा विधानसभेचे तिकीट दिलं होतं, यंदाच्या निवडणुकीत मनसे उमेदवार मंदार हळबे यांना ४५ हजार मतदान झालं होतं, मंदार हळबे हे मनसेचे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जात होते. मंदार हळबेंनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे, त्यामुळे कंडोमपा निवडणुकीत मनसेला जोरदार फटका बसला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली, यात आमदार राजू पाटील यांचीही उपस्थिती होती, यावेळी मनोज घरत यांना मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले.
'...म्हणून मी भाजपात प्रवेश केला'; मनसेच्या नगरसेवकाने सांगितली अखेर 'मन की बात'
काय म्हणाले मंदार हळबे?
मी लहानपणापासून भाजपासाठी काम केलं आहे. तसेच मला राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचं मंदार हळबे यांनी सांगितलं. तसेच १० वर्षे ज्या पक्षाने नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही, असंही मंदार हळबे यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे.
तर राजकीय आमिषापोटी राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष सोडणाऱ्यांची पक्षावर नाराजी नव्हती असं ते म्हणतं आहेत. तरीही ते दुसऱ्या पक्षात गेले. मग यामागे समोरच्या पक्षाकडून आमीष दिलं गेलं नाही, तर मग इतर दुसरं कारण काय असू शकतं? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.