पुणे : राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे.
राज ठाकरे यांची झेड (Z) दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय (Y+) दर्जाची सुरक्षा दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे मनसे नेत्या रुपाली पाटील चांगल्याच भडकल्या आहेत. राज ठाकरे यांचे लाखो चाहते हेच त्यांचे कवच आहे. सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावे, नाहीतर त्यांची अवस्था भाजपासारखी होईल, असा इशाराही रुपाली पाटील यांनी दिला आहे.
सरकारला सत्तेत आल्यापासून याच खेळी खेळायला का आवडतात? असा सवाल करत राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते आहेत. शरद पवार, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची सुरक्षा कमी करुन त्यांचे महत्त्व कमी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असाल, तर मोठी चूक करत आहात, असे रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, राज ठाकरे यांचे लाखो, असंख्य चाहते हेच त्यांचे कवच आहे. भाजपा सरकारनेही असेच केले होते. त्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच फरक दिसत नाही. त्यामुळे तशीच राजकीय गणिते घाणेरड्या पद्धतीने रंगवणे निषेधार्ह आहे. राज ठाकरे हे अतिमहत्त्वाचे नेते आहेत. मागच्या सरकारमधील मंत्र्यांची सुरक्षा कमी करणे समजू शकतो, पण सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावे. नाहीतर त्यांची अवस्था भाजपासारखी होईल. कारण सत्तेचा गैरवापर आणि चुकीचे निर्णय हे जनता पाहत असते. त्याचा परिणाम सरकारवर होत असतो, असे म्हणत रुपाली पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.