सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोचे माजी सदस्य आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धादेब भट्टाचार्य सध्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. २४ वर्ष २०११ पर्यंत ते जाधवपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २००० ते २०११ पर्यंत त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद भूषवले.
३१ वर्ष परराष्ट्र सेवेत काम केल्यानंतर नटवर सिंह यांनी १९८४ साली राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २००४ साली काँग्रेसप्रणीत संपुआचे सरकार आल्यानंतर त्यांना परराष्ट्रमंत्री बनवण्यात आले. त्यांची गांधी घराण्याशी जवळीक होती. पण त्यांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ १८ महिन्यांचा होता. तेल घोटाळयात नाव आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नटवरसिंह सक्रीय राजकारणापासून दुरावले.
आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक असणारे गोविंदाचार्य १९८८ मध्ये भाजपचे सदस्य झाले. २००० सालापर्यंत ते पक्षाचे सरचिटणीस होते. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला तो कायमचाच.
जसवंत सिंह काहीवर्षांपूर्वी भाजपाचे महत्वाचे नेते होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयासह महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद भूषवले. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करुन राजस्थानमध्ये स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. ऑगस्ट २०१४ मध्ये घरात पडून ते जखमी झाले. त्यानंतर जसवंत सिंह राजकारणापासून दुरावले.
भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचवणारे अटलबिहारी वाजपेयी आज वृद्धपकाळामुळे राजकारणातून निवृत्त झाले आहेत. वाजपेयी देशाचे १० वे पंतप्रधान आहेत.
माजी खासदार गुरुदास कामत मुंबई काँग्रेसचे वजनदार नेते आहेत. गुरुदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी सामाजिक कार्य सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गांधी घराण्याच्या अत्यंत निकटवर्तीय असणा-या गुरुदास कामत यांचा राजकीय निवृत्तीचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे.