सातारा – राजकारणात संघर्ष नवा नाही, छत्रपती घराण्यात संघर्ष नको म्हणून आम्ही दोघा भावांनी जुळवून घेतलं, पण माझा काटा काढण्याकरिता कोणी मला टार्गेट करत असेल तर मी अभयसिंह राजेचा मुलगा आहे. राजकारणात मलाही काट्याने काटा काढता येतो अशा शब्दात भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. कुडाळच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते, मी एखादी गोष्ट केली नसेल तर त्याचे खापर माझ्यावर फोडू नका, ते मला कधीच मान्य नाही असंही त्यांनी बजावलं आहे.
यावेळी शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, मला असं राजकारण करायचं असतं तर शशिकांत शिंदे जेव्हा साताऱ्यात आले तेव्हाच त्यांना विरोध केला असता, परंतु शरद पवार साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडली, भाऊसाहेब महाराजांच्या विचारांचा प्रत्येक कार्यकर्ता शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच होता, मी विरोधात काम केले असं म्हटलं जातं, दरवेळी माझ्यावर आरोप होतात ते खपवून घेणार नाही, दिलेल्या शब्दाला जागणारा मी माणूस आहे. माझे घर राजकारणावर चालत नाही, मी आमदार नसलो तरी मला फरक पडत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच माझी वाट लागली तरी चालेल पण त्याचं सर्व संपवल्याशिवाय राहणार नाही, यापूर्वी मी उदयनराजेंच्या विरोधातही निवडून आलो आहे हे ध्यानात ठेवा, जर कोणी माझ्यावर संघर्ष लादायचा प्रयत्न केला तर मीही त्याला पुरून उरणार आहे. पण मी खुनशी प्रवृत्तीचे राजकारण करत नाही, सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे. माझ्या जास्त सभ्य आणि शांत राहण्याचा गैरफायदा घेणे यापुढे चालणार नाही, मी जरी भाजपात असलो तरी राज्याच्या राजकारणात किती ताकद आहे हे मला माहिती आहे. मी जे बोलतो तेच करतो, माझी ओळख छत्रपतींचा वारसदार आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, माझं ज्यांना पटत नसेल त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं असं शिवेंद्रराजेंनी सांगितले.
दरम्यान, शिवेंद्रराजे यांचा चढलेला पारा पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, माझ्याकडे कामासाठी यायचं आणि मला गरज असली की विरोधकांसोबत फिरायचं हे चालणार नाही, नाण्याला दोन बाजू असतात तसंच मलाही माझी राजकीय वाटचाल करायची आहे. काहीवेळा कटू निर्णय घ्यावे लागतील अशी भूमिकाही शिवेंद्रराजे भोसले यांनी मेळाव्यात मांडली.