मुंबई – गणेशोत्सवानिमित्त ठाकरे-पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान आहेत. याचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह कुटुंबाने मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतले.
या भेटीचे फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शरद पवार-प्रतिभा पवार, सदानंद सुळे-सुप्रिया सुळे, तेजस-आदित्य ठाकरे तसेच सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलेही उपस्थित होती. तसेच खासदार संजय राऊत हेदेखील बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी संध्याकाळी ही सर्व मंडळी एकत्र जमली होती.
तसेच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हेदेखील यावेळी वर्षा बंगल्यावर उपस्थित होते.
दरम्यान, गेले सहा महिने जनजीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोनारूपी संकटाचे विघ्न दूर करण्याचे साकडे घालत लाखो भाविक आपल्या लाडक्या गणरायाला मंगळवारी भावपूर्ण निरोप देणार आहेत. या वर्षी चौपाट्यांवर प्रवेश बंदी असल्याने, गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेचा २३ हजार कर्मचाऱ्यांचा ताफा ४४५ स्थळी सज्ज झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्र आणि फिरती विसर्जन स्थळांची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नियमावलीनुसार मुंबईकरांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने व शांततेत साजरा केला.
दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन प्राधान्याने कृत्रिम तलावांमध्ये भाविकांनी केले. मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महापालिका सतर्क आहे. यासाठी १६८ कृत्रिम तलाव संख्या, १७० मूर्ती संकलन केंद्र , ३७ फिरती विसर्जन स्थळे तर ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे तयार केली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकारी-कर्मचारी यांची संख्या तिप्पट करण्यात आली आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जनास मनाई आहे. १ ते २ किमी. अंतरातील भक्तांना त्यांची मूर्ती नैसर्गिक विसर्जन स्थळावरील कर्मचाऱ्यांकडे सोपवावी लागेल. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई असल्याने कृत्रिम तलावाचा वापर लगतच्या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.