“शिवसेना संपवायची अन् राष्ट्रवादीला ताकद द्यायची हा शरद पवारांचा प्रयत्न”; माजी मंत्र्याचा आरोप
By प्रविण मरगळे | Published: October 6, 2020 06:17 PM2020-10-06T18:17:02+5:302020-10-06T18:18:50+5:30
Shiv Sena, NCP, Shivaji Kardile News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष भाजपाकडून होत असतो.
मुंबई – राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मात्र सरकारमध्ये कायम राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो, यातच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप लावला आहे.
याबाबत शिवाजी कर्डिले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर पडू दिलं जात नाही, मात्र शरद पवार या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात फिरत असतात, त्यातून एवढाचं हेतू दिसतो शिवसेना संपवायची आणि राष्ट्रवादीला ताकद कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील राहायचं असा टोला त्यांनी लगावला आहे. कोरोना काळात बेड उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन नाहीत, लाखो रुपयांचे बिल होतं, सर्व सामान्य जनता आता सरकारच्या अपयशावर बोलतेय असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष भाजपाकडून होत असतो, सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील असंही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं, त्यावर मुख्यमंत्रीही पलटवार करतात. मी व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही जिथे पोहचत नसाल त्याठिकाणी पोहचतो, काम करतो असा चिमटा मुख्यमंत्री विरोधकांना काढतात.
केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या
ठाकरे सरकारला राज्यातील जनतेशी काहीही देणे घेणे नाही. केवळ सत्तेला चिटकून बसलेले सरकार अशीच या सरकारची व्याख्या आहे. सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ गेला आहे. मात्र, तरीही रुग्णांना सुविधा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात मोठे घोटाळे झाले आहेत. गव्हाचा घोटाळा असेल, तांदळाचा घोटाळा असेल. कारण केंद्र सरकारने लोकांसाठी दिलेले अन्नधान्य पोहोच करण्याची दानतही या सरकारमध्ये राहिली नाही. या सरकारमध्ये समन्वय नाही, 'काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगले समजते, की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सत्तेत आहोत. यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही, सरकार चालवायचे आणि सरकारमध्येच रहायचे. असेच त्यांचे काम सुरू आहे असा टोला भाजपा नेते प्रा. राम शिंदेंनी लगावला होता.