पुणे: जिल्ह्यातील शिरूर व मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूकीची अधिसूचना येत्या मंगळवारी (दि.2) प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे या मतदार संघातून निवडणूक लढविणा-या उमेदवारांना 2 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीतच अर्ज भरता येणार आहेत. शिरूरचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात तर मावळचे अर्ज आकुर्डी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत.लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून पुणे व बारामती मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 2 एप्रिल रोजी मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यामुळे या मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना मंगळवारपासून संबंधित निवडणूक निर्णय अधिका-याच्या कार्यालयातून अर्ज घेता येतील.मात्र,केवळ 9 एप्रिलपर्यंत प्राप्त होणारे अर्जच स्वीकारले जाणार आहेत.प्राप्त होणा-या अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी केली जाणार असून 12 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघांच्या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. शिरूरमधून शिवेसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. तर मावळ मतदार संघातून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच इतर पक्षांचे उमेदवार आणि काही अपक्ष उमेदवार सुध्दा या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यामुळे कोणता उमेदवार केव्हा अर्ज दाखल करणार याबाबत उत्स्कूता आहे.शिरूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील रमेश काळे यांच्या दालनात शिरूरच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. तर मावळ लोकसभा मतदार संघाचे अर्ज आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या अपर आयुक्त कविता द्विवेदी यांच्या कार्यालयात दाखल करता येणार आहेत.
शिरूर, मावळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 8:35 PM
निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 2 एप्रिल रोजी मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देमंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरता येणार मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघांच्या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर