शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) रविवारी समन्स बजावलं. त्यानंतर याबाबत संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना दुसरीकडे मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर काही शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालयाचा बॅनर झळकवला होता. तर काही ठिकाणी शिवसैनिकांनी आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल असे बॅनर्स झळकावले असल्याचा दावा करत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
"शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल. देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा सुरू केला की काय शिवसेनेने? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे," असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्लाबोल केला.
"संजय राऊतांसारखे मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतात, मैदानात आल्यावर कळेल त्यांना 'नागडं' कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ' मै नंगा हू'. एका नोटीसला इतके घाबरले संजय राऊत," असंही ते म्हणाले.