मुंबई – शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याभोवती पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियात सत्तारांची व्हिडीओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अब्दुल सत्तार कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. भगवान जिरवक नावाच्या या कार्यकर्त्याने मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफी यावरुन अब्दुल सत्तारांना प्रश्न विचारला होता. त्यावर अब्दुल सत्तार संतापले.
याबाबत भगवान जिरवक म्हणाले की, अब्दुल सत्तार टाकळी जिरवक येथे आले असता, त्यांना मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारला त्यावर त्यांनी मला शिवीगाळ केली, मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास सर्वस्वी अब्दुल सत्तार जबाबदार राहतील असं त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारावर शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खुलासा करत सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
तो फेक व्हिडीओ आहे, दोन कार्यकर्त्यांमधील देवाणघेवाण होती त्यावरुन ते सरकारला वेठीस धरु लागले, सरकारने १९ हजार कोटी शेतकरी कर्ज माफ केले त्यातून त्यांच्या त्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये १ लाख रुपये दिलेत, मात्र तरीही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ज्यारितीने बोलत होते, मी लोकांशी बोलत असताना त्यानं वारंवार अडथळा आणला. प्रत्येक वेळेस अशाप्रकारे काहीतरी घडवायचं हे विरोधकांचे राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच मुख्यमंत्र्याबाबत कोणी अपशब्द बोलत असेल तर ऐकून घेणार नाही, विरोधकांनी अशा मुलांना दारु पाजून दुसऱ्याच्या सभेत गोंधळ करण्यासाठी पाठवू नये, विरोधक असं करणार असतील शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, गेलो तिथे ९९ टक्के मराठा आहेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी यासाठी आम्ही त्य़ाठिकाणी गेलो होतो, तिथे वैयक्तिक अशाप्रकारे सरकारवर टीका करु लागले, संपूर्ण गावाने प्रश्न विचारला असता तर नक्कीच उत्तर दिलं आहे असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मी पहिल्यांदा राजीनामा दिला होता, मराठा समाज मोठा भाऊ आहेत, महाविकास आघाडी सरकारचं काम चांगले चाललंय, मुख्यमंत्र्यांचे देशभरात नाव होतंय त्यावरुन विरोधकांना पोटशूळ उठला आहे. हे पहिल्यांदाच माझ्यासोबत घडलं नाही, तर याआधीही अशाप्रकारे घडले आहे. सरकारने याची चौकशी करायला हवी, याची सत्यता बाहेर येईल, यांचा बोलवता धनी कोण? हे समोर यायला हवं. बदनामी करण्याचं षडयंत्र विरोधकांकडून रचलं जातं, आघाडी सरकार ज्याप्रकारे काम करतंय त्यावरुन विरोधकांना पोटसूळ उठलं आहे असा आरोपही अब्दुल सत्तार यांनी केला.