मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हं दिसत आहेत, गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाचं रान उठवलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला होता, परंतु किरीट सोमय्या यांच्याकडून होणाऱ्या आरोपांची मालिका संपत नाही, त्यामुळे आता शिवसेना किरीट सोमय्या यांच्याविरोधात कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपांमुळे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जात असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी तयारी शिवसेनेने केली आहे. सोमय्या यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही असं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं, त्यासाठी किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची चाचपणी शिवसेनेकडून केली जात आहे असं एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. याबाबत एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनीही किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ही मंडळी बेफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते आणि माझ्या कुटुंबासोबत तेच केले. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा, आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं असा इशारा त्यांनी दिला.
किरीट सोमय्यांचे आरोप काय?
ठाकरे आणि नाईक कुटुंबीय यांच्यातील जमीन व्यवहाराचे आणखी नऊ सातबारा उतारे सादर केले. ठाकरे कुटुंबाने आतापर्यंत जमिनीचे ४० व्यवहार केले असून त्यापैकी ३० व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी केला. तर, दहिसर येथे भूखंड घोटाळा झाल्याचाही आरोप केला. अजमेरा बिल्डर्सने २ कोटी ५५ लाखांना विकत घेतलेल्या जमिनीसाठी आता मुंबई महापालिकेला ९०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यवहारासाठीचे ३०० कोटी रुपये अजमेरा बिल्डर्सला यापूर्वीच दिले गेले. आता संजय राऊत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये हिंमत असेल तर या आरोपांवर उत्तर द्यावे, असे आव्हान सोमैया यांनी दिले. इतकचं नाही तर इंग्रजांच्या काळात ९९ वर्ष भाडेकरारावर देण्यात आलेल्या जमिनी ९९९ वर्षै करण्यात आल्या. महाकाली माता आणि येथील गुफा बिल्डर्सला दान करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप सोमय्यांनी केला.