मुंगेर : बिहारमध्ये अराजकता पसरू लागली असून आज सकाळी 11.30 च्या सुमारास सत्ताधारी भाजपाच्या नेत्याला दिवसाढवळ्या लोकांसमोर गोळ्य़ा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंगेर जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नितीश कुमार यांच्या सुशासनावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
हल्लेखोरांनी मुंगेरच्या इव्हिनिंग कॉलेजजवळ भाजपाचे प्रवक्ते अजफर शमशी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोर शमशी येण्याची वाट पाहत होते. 27 जानेवारीच्या सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली आहे. शमशी यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांना पटन्याला नेण्याची तयारी सुरु असल्याचे समजते.
भाजपाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार शमशी यांना एक गोळी लागली आहे. भाजपाच्या मुख्यालयामध्ये एक कार्यक्रम होता. शमशी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी घटनेची माहिती घेतली. तसेच डीजीपी एस के सिंघल यांच्यासोबत चर्चा करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
शमशी हे मुंगेरच्या जमालपूर कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. घटनेच्यावेळी ते त्यांच्या गाडीने कॉलेजलाच जात होते. ते गेटवर पोहोचताच त्यांनी चालकाला गाडी तिथेच पार्क करण्यास सांगितले. तेवढ्यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज आला. यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये पळापळ सुरू झाली. शमशी हे जमिनीवर पडल्याचे त्यांच्या चालकाने पोलिसांना सांगितले.
हल्लोखोरांनी शमशी यांच्या कानाखाली, चेहऱ्य़ावर गोळी झाडली. दोन पैकी एक गोळी त्यांना लागली आहे. त्यांची हालत गंभीर असल्याचे सांगितले जात असून उपचारासाठी पटन्याला घेऊन जाण्याची तयारी सुरु आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास सुरु केला आहे.